Tuesday, August 30, 2011

BHARATIYA SHETI

भारताला प्रदीर्घ इतिहास आणि विस्तीर्ण भूगोल आहे. भारतीय शेतीक्षेत्राचा इतिहास पाहिल्याशिवाय भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे फार कठीण आहे. त्या इतिहासाचा येथे केवळ उल्लेखच करणे शक्‍य आहे. कारण हा इतिहास शेतीच्या इतिहासाबरोबर सामाजिक रचनेचा, त्यातील शोषण व्यवस्थेचाही इतिहास आहे. शोषण मुख्यतः शूद्रांचे झाले आणि भारतात शेती व शेतकरी शूद्र मानले गेले होते!

मानवी इतिहासात शेती करणे या प्रक्रियेचा शोध लागला. त्यात भारतीय शेती प्रमुख आहे. या शेतीला किमान नऊ हजार वर्षांचा इतिहास आहे. इतिहासपूर्व शेती (इसवीसनपूर्व दहा हजार वर्षे), इतिहासकालीन शेती (इसवीसनपूर्व अडीच हजार वर्षे), सरंजामदारी शेती (१७ व्या शतकापर्यंत) आणि आधुनिक वैज्ञानिक शेती (१७ वे शतक ते आजपर्यंत) हे जागतिक शेतीचे अंदाजे कालखंड मानले जातात. भारतीय शेतीचा श्रीगणेशा इतिहासपूर्व काळी सिंधू - गंगेकाठी झाला.
भारतीय समाजव्यवस्था वर्ण, जाती आणि लिंग भेदाने भयानक ग्रस्त असल्यामुळे प्राचीन काळापासून भारतीय शेती शेतकऱ्यांच्या मालकीची फारशी कधी नव्हतीच. ती नेहमी भूपती किंवा भूदेव यांच्या मालकीचीच राहिली. येथे आलेल्या अनेक आक्रमकांना वर्ण- ज्ञाती-जमाती भेदांचा फायदा घेऊनच सहजपणे राज्य ताब्यात घेणे शक्‍य झाले. नव्या आक्रमक राजेशाहीतसुद्धा मुळात शोषणग्रस्त असलेला शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्ग शोषणाच्या गर्तेत जास्तच रुतला.
जमिनीचे व्यवस्थापन, निगराणी, महसूल आणि शेती व्यवसायाचा त्यातल्या त्यात सामाजिक विचार भारतात प्रथम मध्ययुगात झाला. बादशहा अकबराने आणि नंतर छत्रपती शिवराय यांनीच शेतकऱ्यांचा विचार केला. अकबराच्या दरबारातील रत्न समजले जाणारे राजा तोडरमल आणि मुझफ्फर खान या अधिकाऱ्यांनी महसुलाची मनसबदारी पद्धती ही शेतीपूरक नवी व्यवस्था आणली. शिवरायांची आज्ञापत्रे म्हणजे तर शिवरायांची शेतीविषयक धोरणेच आहेत. पण आज चित्र भयावह आहे. भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राची मुख्य समस्या म्हणजे भारत शेतीप्रधान संस्कृती असलेला देश असला तरी भारताचे धोरण शेतीप्रधान नाही. शेतीप्रधान देश अशी भारताची जाहिरात आहे, पण त्याच वेळेस शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा देश अशी वास्तविकताही आहे. भारत हा महासत्ता आहे असा आपल्या विद्यमान राज्यकर्त्यांचा लाडका दावा आहे. पण हा दावा सिद्ध करणे अतिकठीण आहे. हा दावा करण्यात किती, कशा व कोणत्या मेखा मारल्या गेल्या आहेत, याचा ऐतिहासिक लेखाजोखा प्रसिद्ध अभ्यासक तत्त्वचिंतक रा. भा. पाटणकर यांच्या अपूर्ण क्रांती या मौलिक पुस्तकात मांडला आहे. ते मुळातून वाचणे आवश्‍यक आहे.
शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि शेतकरी, कष्टकरी वर्ग हा त्या अर्थव्यवस्थेचा अतिशय संवेदनशील पायाभूत घटक असतो. भारतात मात्र हा पायाच कसा ढासळत गेला आणि आजची अर्थव्यवस्था रोगट व नीतिभ्रष्ट कशी बनत गेली, त्याचा शेती व्यवसायावर कसा भयानक परिणाम होत गेला याची सविस्तर माहिती श्री. पाटणकरांनी दिली आहे. फार पूर्वी शेती सर्वश्रेष्ठ, व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ असा समज होता. आज चित्र उलटे आहे. भारतात शेती व्यवसायाची प्रतिष्ठाच गेली. शेतकऱ्याला दारात सोडाच पण घरातही कोणी पुसत नाही. नोकरी, बाबूगिरीच महत्त्वाची ठरली आहे. उपवर मुलींच्या शेतकरी नवरा नको अशा भूमिकेचे विश्‍लेषण काही महिन्यांपूर्वी सकाळने केले होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकतेची भारतीय संकल्पनाही भारतीय वर्ण- जाती- लिंग- भेदाच्या जोखडात अडकलेली आहे. ती जातीयवादी व पुरुषप्रधानवादी आहे आणि शेतीचे नीतिशास्त्र ही आधुनिक गोष्ट आहे. ग्रीक - पाश्‍चात्त्य व आधुनिक युरोपियन तत्त्वज्ञानातील नैतिक संकल्पनांमधूनच व्यक्तिस्वातंत्र्य आणि सार्वजनिक हित या संकल्पना विकसित झाल्या. त्यांनीच शेतीच्या नीतिशास्त्राला जन्म दिला आहे. हे नीतिशास्त्र जागतिक आहे. त्यामुळेच भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचताना भारतीय शेती व्यवसायाचा इतिहास, विद्यमान स्थिती आणि आधुनिक जागतिक नीतिव्यवस्था यांची सांगड घालणे आवश्‍यक आहे. ते शिवधनुष्य असून शेतीतज्ज्ञ, धोरणकर्ते, अभ्यासक व तत्त्वचिंतक आणि शेतकरी या सर्वांनी ते उचलले पाहिजे. हे आव्हान आहे आणि आवाहनही आहे!
हे नव्या संकल्पनांचे जागतिकीकरण आहे. ते स्वीकारणे हा समृद्धीचा मार्ग ठरणार आहे. कारण अकबर आणि शिवरायांनंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खरा विचार एकोणिसाव्या शतकात प्रथम म. जोतिराव फुले यांनीच केला. त्यामुळे म. फुले हेच भारतीय शेतीचे आधुनिक नीतिशास्त्र रचयिते मानले पाहिजेत. (पण आजच्या घडीला दुर्दैवाने त्यांनाही जातीयवादाच्या पिंजऱ्यात अडकून पडावे लागल्याने त्यांचे शेतीविषयक चिंतन साऱ्या भारतीय शेतीचे नैतिक आधार बनू शकत नाही! ते बनले पाहिजे.) म. फुले यांनी सत्य धर्माचा उद्‌घोष सार्वजनिकता ही आधुनिक संकल्पना उपयोगात आणूनच केला होता.
आजच्या एकविसाव्या शतकाच्या आधुनिकोत्तर काळात भारतीय शेती व्यवसायाचे नीतिशास्त्र रचताना हे नीतिशास्त्र पुरुषसत्तावादी नाही तर स्त्री - पुरुष समतावादी असेल, असेही पाहावे लागेल.

No comments:

Post a Comment